
शहरात तीन ठिकाणी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची कारवाई
4 खोके, चार चाकी 2 गाड्या केल्या जप्त
विजापूर रोडवर सायंकाळी तब्बल चार तास महापालिकेचे पथक तळ ठोकून तैनात
सोलापूर : शहरात विविध तीन ठिकाणी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवारी कारवाई केली. या मोहिमेत चार खोके , चार चाकी दोन गाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर विजापूर रोडवर फुटपाथवर आणि रस्त्यावर भाजीसह इतर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत महापालिकेचे पथक तळ ठोकून होते. यामुळे भाजी विक्रेत्यांनी आपला मोर्चा चैतन्य भाजी मार्केटकडे वळविला.
सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने आज सोलापूर शहरातील एसटी बस स्थानक, मरीआई चौक आणि विजापूर रोड परिसरात कारवाईची मोहीम राबविली. महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून पथकाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
आज मंगळवारी सकाळीच अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तासह जेसीबी डंपर घेऊन दाखल झाले. सोबत मोठा पोलीस बंदोबस्तही होता. एसटी बस स्थानकासमोरील रस्त्याच्या कडेला असलेले चार खोके यावेळी जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारच्या सत्रात मरीआई चौक येथे कारवाई करण्यात आली. या ठिकाणी चार चाकी दोन गाड्या जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, सायंकाळी साडेचार नंतर विजापूर रोड येथे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई हाती घेतली. सर्व लवाजमा घेऊन या ठिकाणी पथक तैनात होते. विजापूर रोडवरील फुटपाथ आणि रहदारी अडथळा ठरणारे भाजी व इतर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. फुटपाथवर व रस्त्यावर विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
या परिसरात असलेल्या विजापूर रोड परिसरात असलेल्या चैतन्य मार्केटमध्ये सर्व विक्रेत्यांनी आपला व्यवसाय करावा असे आवाहन करण्यात आले. कोणत्याही स्थितीत फुटपाथवर अथवा रोडवर विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला.
अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह अतिक्रमण प्रतिबंधक आणि मंडई विभागाचे संयुक्त पथक मंगळवारी सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत तब्बल चार तास विजापूर रोड परिसरात तळ ठोकून होते . रोडवर कोणत्याही विक्रेत्यास अतिक्रमण करून व्यवसाय करू दिला नाही.
विक्रेत्यांमुळे चैतन्य भाजी मंडई गजबजली
विजापूर रोडवर फुटपाथवार व इतर ठिकाणी अनधिकृतपणे भाजी विक्री अथवा इतर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देतानाच विक्रेत्यांनी शेजारील चैतन्य भाजी मार्केट मध्ये आपला व्यवसाय थाटावा असे आवाहन करण्यात आले. त्यास बहुतांश विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे चैतन्य भाजी मार्केट गजबजल्याचे दिसून आले.