

कस्तुरबा मंडईमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य
नियमित भाडे वसुली मात्र सोयी सुविधांचा बोजवारा
मोकाट जनावरांचा मुक्त वावर !
महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
सोलापूर : बाळीवेस जवळील कस्तुरबा मंडईमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
झाडी वाढून येथील गोदामाची तर भयानक आणि धोकादायक अवस्था झाली आहे. मोकाट जनावरांचाही मुक्त वावर असल्याचे दिसून येते. केवळ भाडे वसुली करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत आहे.
बाळीवेस नजीक मध्यवर्ती ठिकाणी असलेली महापालिकेची कस्तुरबा मंडई आहे. सन 1951 मध्ये या कस्तुरबा मंडईची स्थापना झाली. अत्यंत नेटक्या व सुनियोजित पद्धतीने सर्व सुविधा युक्त अशी त्यावेळी ही कस्तुरबा मंडई उभारण्यात आली होती मात्र नियमित देखभाल दुरुस्ती व दैनंदिन स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या मंडईची भयाण दुरावस्था झाली आहे. महापालिका यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही असाच प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या मंडईत मोठी वर्दळ असते मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. महापालिका मंडई विभागातील संबंधित कर्मचारी नियमितपणे दररोज येथील विक्रेत्यांकडून पावत्या करतात, भाडे घेतात मात्र स्वच्छतेकडे कानाडोळा का करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या मंडईत मोठ्या गोदामाची सोय करण्यात आली मात्र हे गोदाम आता भयानक स्थितीत असल्याचे दिसून येते. नियमित देखभाल दुरुस्ती व स्वच्छतेअभाव दिसून येतो. गिलावा पडला असून या गोदामाच्या भिंतीवर मोठी झाडी वाढली आहेत. त्यामुळे इमारतीला तडे गेले आहेत. दरवाजे तुटले आहेत. मोठी झाडे वाढेपर्यंत महापालिका मंडई विभाग, झोन कार्यालय इतके दिवस गप्प कसा बसला असा संतापजनक सवाल उपस्थित होत आहे. तातडीने देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे. धोकादायक गोदामाच्या भोवती भाजी विक्रेते व्यवसाय करत असल्याचे दिसून येते.
प्रवेशद्वारही तुटलेल्या अवस्थेत !
प्रवेशद्वारही तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छतागृहाच्या बाजूला असलेला भाग तर चिखलमय झाला आहे. कोपऱ्यात झाडे वाढले आहेत. मोकाट जनावरांचा वावर दिवसभर दिसून येतो. महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. परिसरात सर्वत्र खड्डे आणि पाणी साचल्याचे विदारक चित्र दिसून येते.
स्वच्छतागृह बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या
मंडईमध्ये लोकांची मोठी वर्दळ असते मात्र येथील स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मुतारीच्या दरवाज्यात लाकडी फळी लावण्यात आली आहे. यामुळे येथील स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.